मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०१९ची निवडणूक हरल्यापासून माझ्याबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत. मी पक्ष सोडणार, काँग्रेसमध्ये जाणार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, आदी चर्चांमुळे अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे दोन महिने विश्रांती घेत असल्याची घोषणा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली होती. त्यानंतर पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पंकजा यांनी जे काही करणार डंके की चोट पे करणार, असे सांगत कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. मुंडे या सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी आज भाऊ धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे म्हणाल्या,‘२०१९मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यापासून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्व निवडणुकांमध्ये चर्चा झाल्या. कधीही जाहीरपणे सांगितले नाही. मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अनेक पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केल्या की आमच्याकडे आल्या तर ही पदे देऊ ते देऊ असे सांगितले.’
सोनिया, राहुल यांच्याशी चर्चा नाही
मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त खोटे आहे. ईश्वराला साक्ष ठेवून सांगते की, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली नाही, राहुल गांधींना प्रत्यक्ष बघितले आहे. तर सोनिया गांधी यांनाही बघितलेसुद्ध नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
फॉर्म भरण्यासाठी १० मिनिटांपूर्वी फोन
मागील विधानपरिषद निवडणुकीवेळी मला पक्षाने आदेश दिला. पण, सकाळी ९ वाजता फॉर्म भरायचा असताना त्याच्या १० मिनिटांपूर्वी फोन आला. मला सांगण्यात आले की, तुम्ही फॉर्म भरु नका. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून मी शांत राहिले. असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. अप्रामाणिकता माझ्या स्वभावात नाही. कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली नाहीत. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली आहे, असे म्हणत पंकज यांनी स्वत:ची बाजू मांडली.