मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार आणि इतर आठ लोकांनी राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच्या या धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर देशातील भाजप विरोधी पक्षांची झोप उडाली. पण शपथविधीच्या काही तासांपूर्वी अजित पवार यांच्यासोबतच होते, अशी स्पष्टोक्ती सुप्रिया सुळेंनी दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार यांचे बंड शरद पवारांनी स्पॉन्सर केले आहे, असा निष्कर्श राजकीय तज्ज्ञ लावत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून एवढे मोठे बंड झाले आहे, असा दावाही अनेकांनी केला आहे. त्यात आता सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत त्यांनी शपथविधीच्या काही तासांपूर्वी आपण अजित पवार यांच्यासोबत देवगिरीवर असल्याचे म्हटले आहे. रविवारी मी देवगिरीवर पोहोचले तेव्हा राज्यभरातील आमदार तिथे येत होते. मला काही क्षण असे वाटले की हे सगळे प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरू आहे. चित्रही तसेच होते. पण काही वेळाने मी तिथनं बाहेर पडले आणि नंतर सगळे थेट राजभवनावर गेले. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, असे सुप्रिया सुळे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनाच सर्वाधिकार आहेत. जे बंड करून गेले तेही पवार साहेबांनाच अध्यक्ष मानतात तर मग त्यांनी दुसरी बैठक बोलावण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
तटकरे, पटेलांविरोधात याचिका
खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष आणि सचिवांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीच ही कार्यवाही करण्यात आली आहे. जे झाले ते स्वीकारून पुढे जाण्याची तयारी आम्ही करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडी एकसंध
काहीही झाले तरीगी महाविकास आघाडी एकसंध राहणार आहे. या बंडाचा आघाडीवर मुळीच परिणाम होणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांचे किती आमदार आणि किती खासदार आहेत, याला महत्त्व नाही. त्यांचे देशाच्या राजकारणातील वजन महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.