नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांनी बंडखोरी करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरण्यासाठी शरद पवार यांनी आक्रमकपणे निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जबादारी एका तरुणीकडे देण्यात आली आहे. ही तरुणी राष्ट्रवादीची लेडी जेम्स बँड म्हणून ओळखली जाते. तिचे नाव आहे सोनिया दुहान. त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.
‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही सोनिया या पवार यांच्या मागे पिवळ्या कुर्तीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती.
कोण आहे सोनिया दुहान?
सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत. सोनिया यांनी २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे काम केलं होतं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१९ मध्ये बंडखोरी झाली होती. या गोष्टींशी सोनिया दूहन यांचा संबंध आहे. सोनिया दूहन यांनी २०१९ मध्ये हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका केली आणि अजित पवार गटासह भाजपचे महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे स्वप्न मोडले होते. भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम अत्यंत नाट्यमय पद्धतीने सोनियांनी केलं होतं.
शिंदे गटाच्या बंडखोरीशी देखील कनेक्शन
शिंदे गट बंडखोरी करून सुरतपासून गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेला तेव्हा सोनिया दुहान या त्यांच्या मागावर होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आमदारांशी संपर्क साधण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेही होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि भाजपच्या गोटातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाल्यानंतर ही बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न फोल झाले. या दोन्ही प्रयत्नांमुळे राष्ट्रवादीची ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख सोनिया दुहान यांची आहे.
दिल्ली कार्यालय महत्त्वाचे
अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड केली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळविण्यासाठी पवार यांच्याकडून खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनाही स्वतःकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा स्थितीत दिल्लीतील राष्ट्रवादीचे कार्यालय महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते आपल्याकडेच रहावे यासाठी शरद पवार यांनी आपल्या विश्वासू सोनिया यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
Maharashtra Politics NCP Sonia Doohan Lady Jems Bond