मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
आज प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणे त्यांना गरजेचे आहे. त्यांनी ते करत रहावे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे सर्वांना माहित आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
शिंदेचे बरेच आमदार नाराज आहेत. यांच्यामुळे आम्ही उध्दव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली तीच कारणे परत आमच्या पुढयात आणून ठेवत आहात याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांचा आहे असे मला समजले असल्याचे सांगतानाच ज्यांच्या जिल्हयात विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
शरद पवारसाहेब आमच्याचबरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सातारा – कराड येथे स्पष्ट केली आहे. ती महाराष्ट्राला समजली आहे हे स्वयंस्पष्ट आहे असेही जयंत पाटील म्हणाले.