नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वयाच्या ८३व्या वर्षी शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी शनिवारी ठाण्यातून जात नाशिक येथील येवला गाठले आणि छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात पहिली सभा घेतली. या सभेपूर्वी दौऱ्यादरम्यान ते पावसात भिजले. पावसात भिजलेल्या पवारांचा फोटो बराच व्हायरला झाला. अनेकांना लागलीच २०१९च्या निवडणुकीत पवारांनी पावसात दिलेल्या भाषणाची आठवण झाली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा फोटो पोस्ट करत ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खड़ा हूँ मैं, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खड़ा हूँ मैं, या काव्यपंक्ती लिहिल्या. त्यांच्या पोस्टने पवार समर्थकांमध्ये जोश पेरला आहे.
पवारांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर प्रथमच जाहीर सभा घेतली. पहिलीच सभा त्यांनी येवला येथे घेतली. छगन भुजबळ यांचा भाग समजल्या जाणाऱ्या या गावी सभा घेऊन त्यांनी ओबीसी जनतेला आपलेसे करण्याचा डाव खेळला. मुसळधार पावसात मुंबईहून नाशिककडे निघालेल्या शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं.
यादरम्यान, पावसाचे दिवस असतानाही दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांचा पावसात भिजलेला एक फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. तसेच ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खड़ा हूँ मैं, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खड़ा हूँ मैं, या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. सगळे पळपुटे पळून गेले तरी, मी अजूनही उभा आहे. मी ना थकलोय, ना हरलोय, रणामध्ये अटलपणे उभा आहे, असा त्याचा उर्थ होतो. या माध्यमातून शरद पवार यांचा लढाऊ बाणा दर्शवण्यात आला आहे.
ना टायर्ड, ना रिटायर्ड
शरद पवार यांनी निवृत्तीचं वय अजून झालेले नाही, असे सांगतानाच मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याने विश्रांतीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना चांगलीच चपराक लगावली आहे.