मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या क्षणी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या अगदी काही मिनीटांनी राज ठाकरे यांनी शरद पवारच याचे शिल्पकार आहेत, असा दावा केला होता. अशा प्रकारचा दावा अनेकांनी केला आणि अजूनही करीत आहेत. मात्र आता तर त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने हेच सत्य असल्याचे ठासून सांगितले आहे.
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या पोटातले पाणी हलत नाही. एकदा तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की शरद पवार यांनी कोलकाताला जातो म्हणून सांगितले तरी विमान उडेपर्यंत ते खरेच कोलकाताला गेले की नाही यावर विश्वास ठेवता येत नाही. देशातील सर्वांत मोठा पक्ष सोडून शरद पवारांनी स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादीचे विश्व उभे केले. आपल्याशिवाय पर्याय नाही, हे सिद्ध करून दाखवले आणि एवढी वर्षे काँग्रेसमधून बाहेर पडूनही केंद्रात व राज्यात सत्तेत राहिले. मात्र सख्ख्या पुतण्याने पक्षात फूट पाडल्यानंतर शरद पवार खचले आहेत, असे सांगणाऱ्यांना आत्ता भाजपमध्ये असलेल्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने ही शरद पवारांचीच खेळी असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांचे ४० वर्ष जुने सहकारी चंद्रराव तावरे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी शरद पवारांसह ४० वर्षे काम केलं आहे. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये प्रचार केला. विविध चौकशांमधून सुटण्यासाठी शरद पवारांनी हा कार्यक्रम केला आहे. असा दावा आता चंद्रराव तावरेंनी केला आहे.
कोणता दावा केला?
मी ४० वर्षे शरद पवारांबरोबर राजकारणात होतो. मी निवडणुकीत त्यांचा प्रचारही केला आहे. त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांच्यात कधीही फूट पडू शकत नाही. हे सगळे लोक एकच आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचलले आहे, असे चंद्रराव तावरेंनी म्हटले आहे.
पवार याच्याही पुढे जाऊ शकतात
शरद पवार आत्ता जे करत आहेत त्याच्याही पुढे जाऊ शकतात. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला तर कुटुंबाची वाताहात होणार आहे. अडचण टाळण्यासाठी शरद पवारांनी हे सगळं घडवलं आहे. अडीच वर्षांचं सरकार झालं, त्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते सरकार पाडायची काय आवश्यकता होती?, असा सवालही तावरेंनी केला आहे.