कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे भाजपला कडक इशारा दिला आहे. काही लोक जाती-धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात आणि देशात समाजात तेढ निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. या जातीय विभाजन निर्माण करणाऱ्या शक्तींशी लढण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना त्यांचा जागा दाखविणार असल्याचे सांगत पवार यांनी आगामी काळातील राजकीय घडामोडींविषयी सारे काही स्पष्ट केले आहे.
पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यासोबत आघाडी केली. अजित पवार आता युतीचे सदस्य झाले आहेत. यासह त्यांनी पाचव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार हे आज येथे कराडला आले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार यांनी कराड येथील त्यांचे गुरू आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केले. अन्य पक्ष फोडण्याच्या भाजपच्या रणनीतीला आमचे काही लोक बळी पडले आहेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात आणि देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या शक्तींशी लढण्याची गरज आहे. देशातील लोकशाहीचे रक्षण करणे गरजेचे आहे.
ठिकठिकाणी स्वागत
आज सकाळी शरद पवार हे पुण्याहून कराडकडे निघाले. यावेळी वाटेत रस्त्याच्या कडेला त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उभे होते. कराडमध्ये त्यांचे हजारो समर्थक आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले.