पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून अजित पवार हे समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात अनेक राजकीय हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात अखेर एक महत्त्वाची प्रतिक्रीया आली आहे. राज्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळख असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. त्यांचे पुतणे अजित पवार बंड करणार आहेत का, भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार आहे का, या प्रश्नांची त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
शरद पवार हे आज सासवडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्यासंबंधी कोणीतरी काम करतंय यापेक्षा त्याला काही अर्थ नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी माध्यमांवरील वृत्ताबाबत पवारांनी त्यांची भूमिका मांडली.
पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सांगायचे झाले तर आमचा पक्ष आणि पक्षात काम करणारे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करायचे या भूमिकेत आहेत. त्यापेक्षा दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही. बातम्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक असल्याचे वाचनात आले. मात्र ही शंभर टक्के खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक कोणीही बोलवलेली नाही. मी यासंदर्भात कोणतीही बैठक बोलवलेली नाही. यानंतर माझा देहू येथे कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मुक्कामासाठी मी मुंबईला रवाना होईल. प्रदेशाध्यक्ष सध्या त्यांच्या भागात मार्केट कमिटीच्या निवडणूक प्रचारात आहेत. अजित पवार देखील या कामात आहेत. ते त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. तसेच मी माझे ठरलेले कार्यक्रम करत आहे, असे पवारांनी सांगितले.
पवार यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि मी असे आम्ही एकत्रित भेटलो होतो. त्यासंदर्भात वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे आणि मला भेटण्यासाठी मुंबईला येणार होते. देशपातळीवर विरोधकांची बैठक व्हावी आणि काही कार्यक्रम तयार करावा याची चर्चा करण्यासाठी तसेच या बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. माझी खात्री आहे की श्री. ठाकरे आणि राज्यातील आम्ही सर्वजण राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू. यासंदर्भात असलेल्या सामूहिक कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी असू, अशी माहिती पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.
https://twitter.com/NCPspeaks/status/1648233494374662144?s=20
Maharashtra Politics NCP Sharad Pawar Clarification