मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे प्रमुख व माजी मंत्री शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात त्यांनी अनेकांविषयी स्पष्ट मते मांडली आहेत. मग ते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी असो, शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस असो व महाविकास आघाडीचे सरकार कोसळणे असो. त्यांनी बऱ्याच बाबतीत मांडलेले निरीक्षण आता बातम्यांचा विषय होत आहे.
शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांचा राजकारणातील अनुभव कमी पडल्याचे स्पष्ट मत नोंदवले आहे. राजकारणात कायम सतर्क राहावे लागते. आज घडणाऱ्या घटनांवरून उद्याच्या घटनांचा अंदाज बांधणे आवश्यक असते. राज्याच्या प्रमुखाला राजकीय चातुर्य असणे आवश्यक आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यात त्याची उणीव आम्हाला जाणवत होती. त्यांचा अनुभव कमी पडल्यानेच शिवसेनेतील वादळ त्यांना रोखता आले नाही आणि महाविकास आघाडी सरकारला विराम मिळाला, असे निरीक्षण पवार यांनी नोंदवले आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेत वादळ उठेल, असे वाटले नव्हते. असंतोषाचा हा उद्रेक शमवता आला असता. पण अनुभव कमी पडल्याने त्यांना हा उद्रेक टाळता आला नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत. राजकारणात सत्ता राखण्यासाठी अतिशय वेगाने हालचाली कराव्या लागतात. महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी जो काही पेचप्रसंग निर्माण झाला होता त्याच उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली. प्रकृतीच्या कारणाने त्यांनी तसे केले असावे, असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे प्रयत्न होणारच होते
महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वांत मोठे आव्हान होते. त्यामुळे भाजप अस्वस्थ होते आणि ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार हेही निश्चित होते. त्याची कल्पना असल्यामुळे आमच्या पातळीवर डावपेच हाताळायची आमची तयारी होती. उद्धव ठाकरेंना अनुभवाच्या अभावी पक्षातील वादळ रोखता आले नाही, असे शरद पवार आत्मचरित्रात म्हणतात.
‘पहाटेचे’ खापर काँग्रेसवर
अजित पवार यांनी देवेंद्र फडणविस यांच्यासोबत पहाटे शपथविधी करत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचा प्रतिसाद अडेलतट्टूपणाचा होता. अश्याच एका बैठकीत माझा संयम सुटला. अजित भावनाप्रधान आहे आणि त्यातच त्याने हे पाऊल उचलले असावे, असे सांगत शरद पवार यांनी काँग्रेसवर खापर फोडले आहे. माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. त्याने तिच्याकडे येऊन जे घडले त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली, असेही ते म्हणतात.
Maharashtra Politics NCP Sharad Pawar Book Uddhav Thackeray