मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा करण्याची जेवढी महाराष्ट्रात चर्चा आहे, तेवढीच चर्चा पत्रकार परिषदेला अजित पवार यांच्या अनुपस्थितीची आहे. शरद पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारण्यातही आले. त्यावर त्यांनी प्रत्येकच जण इथे असला पाहिजे असे आवश्यक नाही, असे सांगितले.
शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केल्यानंतर पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका केला. त्याठिकाणी अजित पवार वगळता कुणीही राजीनाम्याचे समर्थन केले नाही. त्यामुळे अजितदादांच्या भूमिकेकडे संशयाने बघितले गेले. त्यानंतर ५ मे रोजी समितीची बैठक झाली आणि या बैठकीत राजीनामा फेटाळून लावण्यात आला. याठिकाणी १५ पैकी ३ लोक राजीनाम्याच्या बाजुने होते असे बोलले जाते. यातील एक नक्कीच अजितदादा असणार, हेही निश्चित आहे. त्यानंतर राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून केली.
यावेळी डाव्या बाजुला प्रफुल्ल पटेल आणि उजव्या बाजुला जयंत पाटील होते. पण अजितदादा कुठेच दिसत नाही, याची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. शरद पवार यांनी अजित पवार कुठे आहेत, हा प्रश्नच चुकीचा असल्याचे पत्रकारांना म्हटले. समितीच्या बैठकीनंतर सगळे सिल्व्हर ओकला आले. तिथे अजित आमच्यासोबतच होता. त्यानंतर प्रत्येकजण पत्रकार परिषदेला येणे आवश्यक नाही, या त्यांच्या उत्तरातही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. कारण पवारांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घोषणा केली आणि अजित पवार यांनी रात्री आठच्या सुमारास अभिनंदन करणारी पोस्ट ट्वीटरला केली. त्यामुळे एवढा वेळ अजित पवार यांनी कशासाठी घेतला असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले अजित पवार…?
‘कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा तसेच महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो,’ असे अजित पवार ट्वीटमध्ये म्हणतात.
सोबतच, आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत,’ असेही ते म्हणतात.
एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 5, 2023
सुप्रिया सुळेंचे नाव मान्य नव्हते
माझ्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांनी तुम्ही अध्यक्षपदी कायम राहावे आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करावे, अशी सूचना केली होती. पण सुप्रिया सुळे यांचे नाव कार्याध्यक्षपदासाठी बहुतांश लोकांना मान्य नव्हते. अर्थात सुप्रियालाही ते मान्य नव्हते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
Maharashtra Politics NCP Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule