मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील नव्या सत्ता समीकरणानंतर शरद पवार ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाची चौथी आवृत्ती काढणार असल्याचे उपहासाने म्हटले जात असतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लवकरच पुस्तक काढणार असल्याचे आज सांगितले. मी लवकरच पुस्तक लिहीणार असून त्याद्वारे अनेक खुलासे होतील, असे म्हणत प्रफुल्ल पटेलांनी थेट शरद पवारांनाच इशारा दिला आहे.
अजित पवारांनी केलेल्या बंडात पटेल यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पक्षाला लागणाऱ्या अर्थसहाय्यात पटेल यांचा कायमच मोठा सहभाग राहिला आहे. त्यामुळेच त्यांना पक्षाचे संकटमोचकदेखील म्हणतात. शदर पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले पटेल यांनी अजित पवारांची साथ देत बंडखोरी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशात त्यांनी आता थेट शरद पवारांनाच आव्हान दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.
या वक्तव्याने खळबळ
‘मी एक सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप कमी बोलतो. कमीच बोललेले बरे. कारण मलाही एक दिवस माझे पुस्तक लिहायचे आहे, पुस्तक लिहिण्याची वेळ येणारच आहे. हे पुस्तक जेव्हा येईल तेव्हा या देशाला अशा अनेक गोष्टी कळतील ज्या कुणालाच माहिती नाहीत. पण आज माझी याबद्दल बोलण्याची इच्छा नाही, असे लिहिणार त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची अजिबात इच्छा नाही, किमान आज तरी तशी इच्छा नाही.’ पटेल यांच्या या वक्तव्याने बरीच खळबळ माजली असून त्यांच्या पुस्तकात राष्ट्रवादी पक्षासंदर्भातील कुठले किस्से, खुलासे, गुपिते असणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
लवकरच देणार सविस्तर उत्तर
मी या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर शोधतोय. परंतु याचे उत्तर मी तुम्हाला आज देणार नाही. त्याची योग्य वेळ येऊ द्या. तुम्हाला आवश्यक असलेला खुलासा मी करणार आहे. आज छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्याचे संकेत दिले आहेत. मी ही यावर सविस्तर बोलेन. त्यावर आपण कधी ना कधी नक्कीच चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला तुमचे उत्तर मिळणार आहे, असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.