पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात अतिशय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्याचे विविध पडसादही उमटत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. मलाही आजच्या या गलिच्छ राजकारणाचा तिरस्कार वाटतो, असे पवार यांनी म्हटले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त रोहित पवार यांनी एक पोस्ट सोशल मिडियात शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज गुरुपौर्णिमेनिमित्त कराडमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि आदरणीय पवार साहेबांचे गुरु स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी प्रितीसंगमावर आदरणीय पवार साहेबांसमवेत अभिवादन केलं. गुरुंचं केवळ नाव वापरायचं नसतं तर त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करायचं असतं याची प्रेरणा आणि एकाच वेळी गुरुंना नमस्कार आणि गुरुंच्या गुरुंना अभिवादन करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. गुरुपौर्णिमा ही औपचारीकदृष्ट्या एक दिवसाची असली तरी गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या आणि केलेल्या संस्काराच्या आधारे वर्षभर मार्गक्रमण करण्यासाठी ऊर्जा देणारा हा दिवस असतो. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही उच्च, उदात्त आणि व्यापक आहे. या संस्कृतीत गुरुस्थानी असलेल्या वडीलधाऱ्या व ज्येष्ठ व्यक्तींचा अवमान कदापि स्वीकारला जात नाही. किंबहुना त्यांचा नेहमीच मानसन्मान राखला जातो. हाच मानसन्मान राखण्याचे संस्कार स्व. चव्हाण साहेबांपासून तर पवार साहेबांपर्यंतच्या नेत्यांकडून राज्याला मिळाले आहेत.
पवार पुढे म्हणतात की, संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारी महान परंपरा महाराष्ट्राला लाभली. या राज्यात पवार साहेब आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेब या नेत्यांनी नेहमीच सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवत राजकारण केलं. सर्वसामान्यांच्या भावनांशी कधीही प्रतारणा केली नाही, म्हणूनच जनसामान्यांनीही या नेत्यांवर जीवापाड प्रेम केलं. परंतु आजकालचं राजकारण बघता, नेत्यांकडून सर्वसामन्यांचा खऱ्या अर्थाने विचार केला जातो का? आजकालच्या नेत्याबद्दल जनतेच्या मनात काय भावना असतील? हे राजकारण जनतेला पटत असेल का? असे अनेक प्रश्न मनाला पडतात. सर्वसामान्य माणूस म्हणून मलाही आजच्या या गलिच्छ राजकारणाचा तिरस्कार वाटतो.
परंतु महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची भूमी आहे, शौर्य गाजवणाऱ्या योद्ध्यांची भूमी आहे, संघर्षाचा वारसा लाभलेली भूमी आहे. महाराष्ट्र कधी रडत बसत नाही तर त्वेषाने लढतो. लढणं हे महाराष्ट्राच्या रक्तातच आहे. विचारधारेसाठी, सर्वसामान्यांसाठी, वैभवशाली विचारांची परंपरा जतन करण्यासाठी लढावं लागेल आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन ‘सह्याद्री’च्या साथीने आम्ही लढणार…. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.