मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून गदारोळ माजलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवरील दावा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील दावा सोडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि ठाकरे गटातीन संजय राऊत यांच्यात घमासान सुरू होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने खऱ्या अर्थाने मोठे मन करत लोकसभेच्या दोन जागांवरील दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट स्वत:चा उमेदवार देणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढताना मागील वेळी लढलेल्या काही जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवली आहे.
त्यानुसार भाजपला पराभूत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन्ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे, तर कल्याणमधून शिंदे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली होती, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची असलेली ताकद लक्षात घेता या दोन्ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे जाव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे या जागांवरील दावा सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
पवारांनी दिले स्पष्ट आदेश
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविलेल्या जागांवर जर ठाकरे गटाचा खासदार निवडून आलेला असेल, तर ती जागा सोडण्याची तयारी ठेवावी लागेल, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिलेत.
Maharashtra Politics NCP Loksabha Seats