मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते मुंबईकडे निघाल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दुसरा भूकंप होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. २०१९मध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. तेव्हाचा पहाटेचा शपथविधी हा देशभरातच चर्चेचा ठरला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादीत हे मोठे बंड असल्याचे बोलले गेले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्रे फिरवली आणि हे बंड अयशस्वी झाले. त्यानंतर आता ४ वर्षांनी पुन्हा असेच काहीसे घडणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिल्याने चर्चांना आणखी जोर आला आहे. तसेच, राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींमुळे या चर्चांना बळकटी येत आहे. अजित पवार यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असून त्यांच्यासमवेत ते भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, यावेळी शरद पवार यांचे यास समर्थन असल्याचे बोलले जाते. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. खास बाब म्हणजे, या सर्व हालचालींमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे सुद्धा भूमिका बजावत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राज्याच्या विविध भागातून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हे मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे आज मुंबईत नक्की काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षाने अधिकृत कुठलीही बैठक ठेवली नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही नेते आणि आमदार मुंबईत येत असल्याने काही तरी घडणार असल्याच्या चर्चांना बळकटी मिळत आहे.
Maharashtra Politics NCP Leaders MLA Mumbai