पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एखाद्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली की, ती अनेक दिवस सुरूच राहते. सध्या राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या चर्चेला तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे, ही चर्चा थांबण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठे भाष्य केले आहे.
राज्यातील सत्तासंर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागतो यावर महाराष्ट्रातील आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे महाविकास आघाडी पक्षातून बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा एका बाजूला आहे. तर दुसरीकडे जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार, असे खुद्द अजित पवारच सांगत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा केला आहे. खडसे म्हणाले की, पुढच्या कालखंडात अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असेही खडसे यांनी म्हटले आहे. खडसे आणखी पुढे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवला असून या पक्षात त्यांना मानसन्मान आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, असे मला वाटत नाही. याबाबत त्यांनी याचा विचारही केला नसावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते.
खडसे असे देखील म्हणाले, की, सध्या राजकारणात काही घडू शकते. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट झाल्यानंतर नेमके काय येते हे मला माहिती नाही. मात्र यातील १६ आमदार हे अपात्र झाले तर राज्यातील राजकारणातचे चित्र आणखी बदलू शकते. त्यामुळे १४५ चा आकडा पूर्ण जो करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. तसेच कदाचित अजित दादा हे मुख्यमंत्री होण्याचा १४५ चा आकडा जमवू शकतात, त्याचप्रमाणे ते मुख्यमंत्री होऊ शकतात. दरम्यान एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मागे विनाकारण लावलेल्या ईडीच्या चौकशी बद्दलही भाजपवर कठोर टीका केली आहे
विखे-पाटलांचे वक्तव्यही चर्चेत
एकीकडे अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे भाजपचे नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics NCP Eknath Khadse CM Ajit Pawar