मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – – आपल्यासोबतच्या आणि विरोधातील पक्षांना सतत संभ्रमात ठेवणे, अशी ख्याती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची आहे. अर्थात हे अनेक वर्षांपासून चालत आले आहे. पण आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे संभ्रम निर्माण करणे त्यांच्या मित्रपक्षांचे टेंशन वाढविणारे आहे.
अजित पवार यांनी काकांची अर्थात शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि दिग्गज नेतेही भाजपसोबत गेले. अजित पवार यांनी शरद पवार यांनाही साथ देण्याची विनंती केली. त्यांची मनधरणी केली. मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत कदापि जाणार नाही, ही भूमिका कायम ठेवली. मात्र तसे असतानाही शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची अलीकडेच बैठक झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला.
एवढ्यावर भागले नाही तर लगेच दोन दिवसांनी काका-पुतण्या मुंबईत त्रयस्थ ठिकाणी भेटले आणि बराचवेळ चर्चा केली. त्यामुळे मित्र पक्षांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. देशभरात भाजपविरोधी आघाडीला शरद पवार यांनी मी तुमच्याच सोबत आहे, असे सांगून ठेवले आहे. राज्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेना यांनाही ते तसेच सांगत आहेत. अशात अजित पवार यांच्याशी त्रयस्थ ठिकाणी भेटून शरद पवार यांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल मित्र पक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे यावेळची बैठक प्रसिद्ध उद्योजक अतुल चोरडिया यांच्या मुंबईतील बंगल्यावर झाली, त्यामुळे अधिकच टेंशन वाढले आहे.
उद्धव ठाकरे-नाना पटोले भेट
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची बैठक झाली. दोघांनीही या भेटीच्या संदर्भात दीर्घ चर्चा केली आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. खासदार संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेऊन नेमके काय चाललेय, याची माहिती घेणार आहेत, असे राजकीय सूत्रांकडून कळते.
Maharashtra Politics NCP Congress UBT Pawar Secret Meet