अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकारणाचे चाणक्य म्हटले जाणारे आणि गेल्या ५४ वर्षांपासून संसदीय राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार यांनी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, उद्या महाराष्ट्रात आघाडी होईल की नाही, हे माहीत नाही. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी), शिवसेना (उद्धव गट) आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले की, आज आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत. एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे, पण फक्त इच्छा पुरेशी नसते. यापुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी कायम राहणार की नाही याबाबत चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना पवार यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडी २०२४च्या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवणार का हे स्पष्ट झालेले नाही. जागा वाटपापर्यंत अनेक समस्या आहेत. ज्यावर अजून चर्चा झालेली नाही. पक्षांची स्वतःची रणनिती आहे. मग आताच आपण कसे म्हणू शकतो की महाविकास आघाडीतील पक्ष २०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढतील की नाही, असे पवार म्हणाले.
शरद पवार रविवारी बोलले होते की, महाविकास आघाडी ने म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकत्र लढवायला हव्यात, असं मला वाटतं. मात्र, पक्ष आणि आघाडीत सहभागी घटकांशी चर्चा करूनच या विषयावर निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात हा मुद्दा समाविष्ट नव्हता आणि निर्णयानंतरच आपल्याला याची माहिती मिळाली होती, असे पवार यांनी सांगितले.
बावनकुळेंचा निशाणा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी कुठपर्यंत जाणार याविषयी जनतेसह त्यांचे नेतेही संभ्रमात आहेत. शरद पवार जे काही बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पवार साहेबांना लवकरच कळेल की त्यांच्या लोकांनीच त्यांना सोडले आहे. ज्याचे ते नेतृत्व करीत आहेत.
Maharashtra Politics NCP Chief Sharad Pawar on Alliance