पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामील झाला, तर शरद पवार गट विरोधी बाकावर बसलेला आहे. तसे बघितले तर राष्ट्रवादीचा हात दोन्ही तबल्यांवर आहे. पण या सर्वांत पक्षामध्ये मात्र काका-पुतण्यात सध्या अध्यक्षपदावरून जोरदार वॉर सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण आहे, या वादातून आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढे गेली आहे. सध्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण, यावरू दावे-प्रतिदावे होत आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजितदादाच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. ‘निवडणूक आयोगाकडून आमच्या बाजूने निर्णय लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आम्ही याचिकेत सांगितलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल,’ असे सुनील तटकरे म्हणाले.
विशेष म्हणजे अजित पवारही यावर स्पष्ट बोलले आहेत. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. सुनील तटकरेंनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता ‘मला माझ्या सहकाऱ्यांनी अध्यक्ष केले आहे. त्यामुळे मी आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
आम्हीच निर्णय घेऊ
हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या सर्व ५३ आमदारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पत्र दिले होतं, असे विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी ‘त्यांनी पत्र दिले होते, पण त्यावर चर्चा झाली होती, निर्णय झाला नाही. चर्चा आणि निर्णय यात फरक आहे,’ असे म्हटले आहे. त्याचवेळी जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. यासंदर्भातला निर्णय आम्हीच घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics NCP Ajit Pawar Party President
Sharad Pawar Pune Sunil Tatkare