मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात एकच राजकीय चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार आहेत. या चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भातील चर्चेची खरी सुरुवात अंजली दमानिया यांनी केली. त्यानंतर आता चर्चा आहेत की अजित पवार हे भाजसोबत जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री होणार आहेत. यासंदर्भात आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र अजित पवार यांच्याविषयीच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तरीही अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात ऊत आला आहे. अशातच शरद पवारांनी कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. पण भाजपला अजित पवार का हवे आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संमती मिळावी, जेणेकरून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा फसवणूक टाळता येईल.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा देखील या वृत्तपत्राने केला आहे. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार का? या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र गमावायचा नाही. त्यामुळे भाजपला राज्यात मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यायचा आहे. त्यामुळे भाजप अजित पवारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात ३५ टक्के मराठा आहेत.भाजपशी हातमिळवणी करण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी अजित पवारांना याबाबत स्वतः निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर, अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबाही आहे. पण, शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत.
अजित पवारांनी दिल्ली येथे अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीला जाण्यासाठी अजित पवारांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला होता. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते. या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खाते वाटपाबाबत चर्चा झाली आहे, असेही सांगण्यात येत आहे.
याबाबत आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले की नाही? हे त्यांनाच विचारावं लागेल. ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांची भेट काही कामासाठी किंवा राजकीय गोष्टीसाठी होती माहिती नाही. पण, मुळात भेटले का नाही, याचे कोणीतरी खात्रीलायक स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यामुळे या तर्कावर चर्चा करण्याची गरज नाही.”
दरम्यान, अजित पवारांनी भाजपला पाठींबा द्यायचा ठरविले. तर त्यांच्यासोबत तेवढे आमदार असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे सध्या ५३ आमदार आहेत आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी २ तृतीयांश आमदार फुटणे आवश्यक आहे. म्हणजे ३६ आमदार होतात. त्यामुळे अजित पवारांना इतक्या आमदारांना सोबत घ्यावे लागेल. एकट्या अजित पवारांनी भाजप सोबत येऊन काहीही होणार नाही. त्यामुळे सध्या तरी ही केवळ चर्चाच आहे प्रत्यक्षात काय होते हे काळच सांगू शकेल.
Maharashtra Politics NCP Ajit Pawar Ex CM Prithviraj Chavhan