मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या बंडखोरांवर अखेर कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरुन त्यांच्या राज्यव्यापी जनसंपर्क यात्रेला प्रारंभ केला आहे. त्यानंतर आता पक्षीय पातळीवरही जोरदार कारवाई सुरू झाली आहे. त्यात एका आमदाराची विकेट पडली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याघटनेनंतर शरद पवारांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सर्वप्रथम त्यांनी जनसंपर्क यात्रेची घोषणा करुन त्यास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर येत्या ५ जुलै रोजी मुंबईत आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. आणि आता थेट कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शिवाजीराव गर्जे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाई केली आहे. पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोण आहेत गर्जे
गर्जे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत. गर्जे हे अजित पवार समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. गर्जे हे सुरवातीच्या काळात काही दिवस प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यानंतर राज्य सरकारच्या सेवेत प्रारंभ करुन अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली. पुढे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन राजकीय मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीनही पक्षांत काम केले. गेली २० वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांनी प्रशासन, निवडणूक नियोजन, पक्ष संघटना या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या. २०१४ मधे काही काळ राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या ‘वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळा’च्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.
या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. हे दोघेही पदाधिकारी महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.