मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या दोन कट्टर वैऱ्यांना एकत्र आणणे शक्य आहे, पण शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र आणणे केवळ अशक्य आहे, असे महाराष्ट्रात बोलले जाते. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही किमया साधली आहे. त्यांच्यामुळे दोन्ही गटातील आमदार-खासदार मंगळवारी न्यायालयात एकत्र आले होते.
नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील नेत्यांना डिवचण्यासाठी ‘सामना’ कार्यालयापुढेच जाहीर सभा घेतली होती. ही सभा उधळून लावण्यासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी धुमाकूळ घातला. सभा उधळली गेली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीसाठी सध्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि गटांमध्ये असलेले नेते न्यायालयात एकत्र आले होते. तीन खासदार, चार आमदार यांच्यासह ३८ आरोपींवर तब्बल १८ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले.
२४ जुलै २००५ मध्ये ही घटना घडली होती. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला होता. त्यानंतर पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यात एकूण ४७ आरोपी होते. पाच आरोपींचा मृत्यू झाला तर चार आरोपी गैरहजर होते. चौघांपैकी संजय बावके, रवींद्र चव्हाण आणि हरिश्चंद्र सोलकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. तर श्रीधर सावंत रुग्णालयात असल्याने त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली.
दिग्गजांचा समावेश
आरोपींमध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि आमदार रवींद्र वायकर यांचा समावेश आहे. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
आजी-माजी नेत्यांवरही आरोप
आरोपींमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ, शिंदे गटाचे माजी आमदार किरण पावसकर, मनसेचे माजी आमदार बाळ नांदगावकर, ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर विशाखा राऊत, शिंदे गटाचे यशवंत जाधव, राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Maharashtra Politics Narayan Rane Sabha Court