मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागलेले आहे. अशात या प्रकरणी शिंदे गटाने आक्रमकतेचे दर्शन घडवित तब्बल सहा हजार पानी उत्तर सादर केले आहे. या पानांचा अभ्यास करण्यात मोठा अपव्यय होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला मोठा विलंब होणार असल्याचे सांगितले जात आहे.
वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे सविस्तर उत्तर सादर करण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले आहे. तेव्हापासून, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर दोन्ही गटाच्या आमदारांनी मिळून विधानसभा अध्यक्षांना एकत्रित उत्तर पाठवले होते. ठाकरेंचे आमदार सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी याचिका केली होती त्यानंतर या आमदाराच्या सुनावणीला वेग आलेला आहे पण आता प्रत्येक आमदाराच्या सुनावणीला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही.
निर्णय अंतिम टप्प्यात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रेसंदर्भात शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीसा बजावल्या होत्या. तसेच या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिले होते. ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आले आहे. राज्यात गेल्या वर्षभरापासून राजकीय नाट्य सुरु आहे. कधी कोर्टात तर कधी निवडणूक आयोगात आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात अखेरचा निर्णय येऊन ठेपला आहे. लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १६ आमदारांच्या पात्र अपात्रेवर सुनावणी घेणार आहे. गेल्या वर्षभरापासून या आमदारांच्या सुनावणी वरून विविध चर्चा सुरु झाल्या आहेत पण निर्णय आता अंतिम टप्प्यात आला आहे.
Maharashtra Politics MLA Disqualification Shinde Faction Strategy
Assembly Speaker