नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे आणि शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरेर यांची शहरात गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे. आदित्य हे शहरात एका व्याख्यानासाठी आले होते. तर, भुसे हे मालेगावहून अचानक नाशकात दाखल झाले. त्र्यंबकरोडवरील एका रिसॉर्टमध्ये दोन्ही नेत्यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. ही भेट का झाली आणि त्यात काय चर्चा झाली याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकना शिंदे हे भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकारणात हा मोठा भूकंप होता. त्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्हासाठी मोठी लढाई झाली. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा गेला. त्याचबरोबर शिंदे यांनी ठाकरे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच, ठाकरे यांनीही शिंदे आणि बंडखोरांवर आरोप केले. तसेच, बंडखोरांना मातोश्रीची दारे बंद झाल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर आता नाशिकमध्ये दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भुसे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने एकमेकांवर आरोप करत आले आहेत. असे असताना या नेत्यांनी अचानक का भेट घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाश्वत शहर विकासात युवकांचे योगदान या कार्यक्रमासाठी आदित्य हे मुंबईहून नाशिकला आले होते. नाशकातील काही संघटनांनी हा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये आयोजित केला होता. त्यास आदित्य यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर अचानक आदित्य यांच्या भेटीसाठी दादा भुसे हे नाशकात दाखल झाले. त्र्यंबकरोडवरील एका रिसॉर्टमध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीत काय झाले, याविषयी अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री बदलणार असून लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी दिसतील अशी चर्चा होत आहे. या चर्चांमध्येच आता भुसे आणि ठाकरे यांची गुप्त भेट झाली आहे.
Maharashtra Politics Minister Dada Bhuse UBT Aditya Thackeray Secret Meet Nashik