मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘केंद्रात मोदी, राज्यात शिंदे’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. एका अध्ययनानुसार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॉप्युलरिटीमध्ये मागे टाकले आहे. विरोधक शिंदेंवर कितीही टीका करत असले तरी राज्याचे स्टेअरिंग संपूर्णत: त्यांच्याच हाती असून जनतेनेही त्यांना स्वीकारल्याचे चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत.
हे तर दबावतंत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेची प्रसिद्धी करणारी विविध वर्तमानपत्रातील जाहिरात एकप्रकारचे दबावतंत्र असल्याचीही टीका होत आहे. मुख्य म्हणजे मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. कल्याण येथे तर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाजपने जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीने चर्चेचा उधाण आले आहे.
शिंदेंशिवाय नाही पर्याय
शिंदे गटाच्या जाहिरातीनुसार राज्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या जाहिरातीमधल्या दाव्यांनुसार राज्यात भाजपाला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने दिला कौल दिला आहे. याचाच अर्थ भाजपा आगामी निवडणूक शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकणे शक्य नाही, असा थेट संदेश देण्यात आला आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde Popularity Devendra Fadnavis