मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारणाची सगळीच गणिते गडबडली आहेत. ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्यांच्यावर कारवाई करायची की नाही असा प्रश्न पोलीस आणि तपास यंत्रणांना पडला आहे. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात ओरडणाऱ्या कार्यकर्त्यांना मन मारून एकत्र यावे लागत आहे. अशा अनेक घडामोडींसोबतच मंत्रीमंडळाची आस लावून बसलेल्यांसमोरही मोठा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांपासून मंत्री व आमदारांमध्येही याची गरज काय होती, हाच प्रश्न निर्माण झाला. तर मंत्रीपदासाठी बाशिंग बांधून तयार असलेल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. तो त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलूनही दाखवला. कुणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही शिंदेंनी त्यांच्या आमदारांना दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नाराजीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळांचे वाटप एक आठवड्याच्या आत करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांना महामंडळे देऊन शांत बसविण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. यामध्ये केवळ शिवसेनेचेच नव्हे तर भाजपच्याही आमदारांचा समावेश असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
आम्ही फक्त पालख्या वाहाच्या का?
शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट राष्ट्रवादीच्या शपथविधीमुळे चांगलेच भडकले आहेत. ‘माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही देखील बंड केले होते, आम्ही फक्त पालख्या वाहत राहायचे का?’ असा प्रश्न नाराज आमदारांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे कळते.