मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चेमुळे राष्ट्रवादीत आनंद असला आणि भाजपचे आमदार तटस्थ असले तरीही शिवसेनेच्या आमदारांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे छान चालले असताना अजित पवार पवारांची एन्ट्री शिंदे गटाला खुपली. त्यावरही कसेबसे स्वतःला समाजावून सांगत त्यांनी दुर्लक्ष केले. पण आता अजित पवार मुख्यमंत्री होणार ही चर्चा सुरू झाल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार यांची सरकारमधील एन्ट्री आता ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ या म्हणीप्रमाणे शिंदे गटाला वाटू लागली आहे. राष्ट्रवादी विरोधी बाकावर असताना सत्तेत सामील झाली. एवढेच नव्हे नऊ नेत्यांना मंत्रीपदाची शपथ घेता आली. त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीमुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडला आणि शिंदे गटात नाराजी पसरली. पण आता अजित पवार यांच्या नावाची चर्चा थेट मुख्यमंत्रीपदासाठी होत असल्यामुळे आपल्या नेत्याचेच पद धोक्यात असल्याचे शिंदे गटाला वाटू लागले आहे. अशात आपली नाराजी समन्वय समितीच्या निदर्शनास आणून देण्याची पूर्ण तयारी शिंदे गटाच्या आमदारांनी केली आहे.
निधी वाटपात घोळ
अजित पवार यांनी अर्थखाते मिळताच राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिकचा निधी देऊन मोठा घोळ केला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. खासदार संजय राऊत यांनी हे आरोप केले आहेत. अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपात कुणावरही अन्याय झाला नाही आणि होणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
दुसरा आठवडा गाजणार
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांवर टीका केली होती.त्यापैकी जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी मात्र निधी मंजूर झालेला नाही. शिवाय, शरद पवार गटाच्या काही आमदारांनाही निधी मिळालेला नाही. त्यातल्या जयंत पाटलांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजूर करुन अनेकांना धक्का दिला. त्यामुळे निधीवाटपावरुन अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजण्याची शक्यता आहे.