मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून त्यांच्याच कुटुंबात उभी फूट पाडून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजपसोबत सत्तेत आणले. आनंदाने संसार सुरू झाला. सारे काही सुरळीत चाललेय असे फडणविसांकडून सांगितले जात असले तरीही आता त्यांच्यासाठीच अजितदादा त्रासदायक ठरू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या विभागांच्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला अॅक्टीव्ह व्हायला सांगितले. त्यात फडणविसांनी कशीबशी शिंदेंची समजूत काढली. तर आता अजितदादांचा मोर्चा भाजपच्या दिशेने वळला आहे. त्यांच्या काही निर्णयांचा त्रास आता भाजपच्या नेत्यांना होऊ लागला आहे. आणि अर्थातच त्याची झळ देवेंद्र फडणवीस यांना पोहोचत आहे. काही दिवसांपूर्वी सहकारी संस्थांवरील सरकारचे नियंत्रण संपुष्टात आणण्याचा निर्णय करून घेत दादांनी भाजपला शह दिला होता. आता त्यांनी साखर कारखान्यांना सरकारी कर्ज हवे असेल तर कारखान्यांच्या मालकांचे किंवा सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र देणे अनिवार्य केले आहे.
या निर्णयाचे फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. पण त्यांनी ज्या कारखान्यांच्या बाबतीत हा निर्णय घेतला आहे ते सर्व कारखाने भाजपच्या नेत्यांचे आहेत. त्यामुळे थेट फडणविसांनाच आव्हान दिल्यासारखे होत आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) मंजूर केलेले कर्ज हवे असेल तर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे, कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा आणि गहाणखत व अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी घालत सरकारने या कारखान्यांची कोंडी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कारखाने भाजप नेत्यांचेच आहेत.
अशी केली कोंडी
राज्यातील आर्थिक अडचणीतील सहा साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमने ५४९.५४ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलावर मार्जिन मनी कर्ज मंजूर केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना ११३.४२ कोटी (माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील), पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना १५० कोटी आणि निरा-भिमा सहकारी साखर कारखाना ७५ कोटी (दोन्ही कारखाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित), लातूर जिल्ह्यातील किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना ५० कोटी (भाजप आमदार अभिमन्यू पवार), जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना ३४.७४ कोटी (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित), सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना १२६.३८ कोटी (भाजप खासदार मुन्ना महाडिक) या कारखान्यांचा समावेश आहे.
Maharashtra Politics DYCM Ajit Pawar BJP Leaders Finance
Devendra Fadnavis Sugar Factory Loan Property Assurance