मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या नव्या समीकरणाला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या प्रवेशाने शिवसेना, भाजप यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. विस्तार रखडला आहे. अशात कुणाचे मंत्रिपद जाणार की काय, अशीदेखील भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील नेते असंतुष्ट आहेत. त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. मंत्रिपदाच्या चर्चा सुरू असतानाच कानामागून आली आणि तिखट झाली या उक्तीप्रमाणे अजित पवार यांच्या गोटातील आमदारांनी शपथदेखील घेतली. अशात शिवसेना आणि भाजपमधील काही नेत्यांनी खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांना अर्थखाते देण्यास नकार दर्शविला आहे. यावर उतारा म्हणून ही समन्वय समिती काम करणार आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.
अजित पवारांसोबत जवळपासल ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहेत. मात्र युतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेनेच्या आमादारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यावरुन दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. मात्र अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आता महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यांचा आहे समितीत समावेश
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकी ४ सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. एकूण १२ सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार, तर शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे समितीत चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचा समावेश असणार आहे.