मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील पॉवरवॉर काही संपायला तयार नाही. तीनही पक्षातील नेते परस्पर भिडत असल्याच्या घटना सातत्याने घडताहेत. पुण्यात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्या धुसफुस सुरू असतानाच आता नाशिकमध्ये दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात सामना रंगला आहे. महायुतीतील या भांडणांमुळे हे सरकार स्व:चा कालावधी पूर्ण करणार की नाही, याबाबत शंकाकुशंका व्यक्त होऊ लागल्या आहेत.
ट्रिपल इंजिन सरकार, सत्तेचे त्रिशुळ असा उल्लेख होत असलेल्या राज्यातील महायुतीतील नेत्यांना परस्पर संघर्ष टाळणे कठीण होऊन बसले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आता सत्तेत एकत्र आले आहेत. अशात पॉवरगेम सुरू झाला आहे. पुणे येथे सुरुवातीपासून चंद्रकांत पाटलांवर अजित पवार वरचढ ठरताहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी आहे. आता नाशकात दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात पॉवरगेम सुरू झाला असून महायुतीसाठी नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे.
गिरीश महाजन दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. लासलगाव मार्केट कमिटीमधील शेतकरी प्रतिनिधींना भेटले. त्यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक लावून देण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे दादा भुसे यांनी देखील सातत्याने सर्व अधिकारी, नाफेडच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करुन हा विषय मार्गी लावण्याचंल आश्वासन दिलं. एका विषयावर, एकाच ठिकाणी दोन वेगळे नेते, वेगवेगळ्या बैठका घेत होते. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आले.
महाजनांचे दौरे वाढले
दादा भुसे यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद घेतले त्यावेळी गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. त्यानंतर आता गिरीश महाजन यांचे वाढते दौरे, नेमके काय संकेत देताय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Maharashtra Politics Cold War Ministers NCP BJP Shivsena Shinde