मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कधी काय होईल याचा भरोसा राहिलेला नाही. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असून त्यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होतील. तसेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांनी वेगळा संसार करून काही दिवस होत नाही तोच नवनवीन सत्तासमीकरणे चर्चेत येऊ लागली आहे. कुणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचे सांगत आहे. तर कुणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र होणार असल्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे आडाखे बांधण्यात येत आहेत. अशात आता नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार हे भाजपमध्ये आले ते मुख्यमंत्री होण्यासाठीच’ असं ठामपणे बोललं जात आहे.
अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदेंचं पुनर्वसन करणं, हे भाजपपुढे आव्हान असेल. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ही मांडणी आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वाऱ्या करीत होते. त्याचसोबत खासदार श्रीकांत शिंदे यांचंही दिल्लीला जाणं होई. तेव्हा काही उलगडा झालेला नव्हता. आता मात्र त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी ठाम शक्यता पुढे येतेय.
राज्यात हवे खंबीर नेतृत्व
भाजपला राज्यात एक सक्षम मराठा नेतृत्व पाहिजे आहे. त्यासाठी मागच्या काही वर्षांपासून भाजपचा शोध सुरू होता. एकनाथ शिंदे आले मात्र ते भाजपच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीपासूनच अजित पवार भाजपमध्ये जातील, अशा चर्चा व्हायच्या. परंतु, प्रत्येकवेळी ‘त्या वावड्या होत्या’ असे अजित पवार सांगायचे. आता मात्र भाजपला अजित पवारांच्या रुपाने तगडे नेतृत्व मिळाले आहे.
फडणवीसांवर दिल्लीश्वर नाराज
देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीश्वर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. फडणवीस यांना राज्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. परिणामत: त्यांना राज्यात ठेवावे की नाही, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत.