मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाच्या सर्व 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व 50 आमदारांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. बैठकीचा अजेंडा गोपनीय ठेवला गेल्याने राजकीय वर्तूळात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्हे कुणाचे यावर निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. शिंदे आणि ठाकरे गटाकडून आयोगाकडे लेखी युक्तिवाद मांडण्यात आला आहे. युक्तिवादावरून आराखडे बांधले जाऊ लागले आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यातच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच आपल्याला अटक होणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीसंदर्भात मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.
तर करायचे काय?
निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या विरोधात निर्णय दिला तर काय करायचे? यावर या बैठकीत खल होणार असल्याचे सांगितले जात आहे. या शिवाय सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवल्यास पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुपारपर्यंत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं चित्रे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरही बैठकीत चर्चा होऊ शकते असे सांगितले जात आहे.
सर्व्हेने वाढविले टेन्शन!
अलिकडेच सी व्होटरचा सर्व्हे आला. त्यात आताच लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप युतीला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युती पूर्वीचा हा सर्व्हे आहे. या युतीनंतर शिंदे गट आणि भाजपला आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics CM Eknath Shinde Call 50 MLA Urgent Meeting