मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांना संधी देण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने खळबळ माजली असून खरोखर असे झाल्यास भाजपात मोठा असंतोष निर्माण होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात आहे. कुणाचा नंबर लागणार यावरून बरेच आडाखे बांधण्यात येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर केवळ विरोधकांमध्येच नाही, तर सत्ताधाऱ्यांसमोरही अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, मंत्रीपदं आणि खातेवाटप. शपथविधीला आठवडा उलटून गेला तरी, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खातेवाटप अद्याप प्रलंबित आहे.
अशातच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, शिंदे-फडणवीस-पवार सत्तेचे नवे समीकरण जुळवणार असून खातेवाटपासाठी भाजपच्या चार ते पाच मंत्र्यांना मंत्रीपदाचा त्याग करत राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र भाजपकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या आहेत. भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी तशी माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत की, नवनिर्वाचित मंत्रीपदे दिल्यानंतर त्यांचा खातेवाटपासाठी काही मोठे फेरबदल केले जातील. त्यामध्ये आताचे जे मोठे मंत्री आहेत, त्यांना राजीनामा द्यायला सांगितले जाईल आणि त्यानंतर त्यांचे खाते नव्या मंत्र्यांना दिले जाईल. यामध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडून राजीनामा घेतल्याचे बोलले जात आहे.
काहींची नावे चर्चेत
काही मंत्र्यांची नावेही समोर आले होते. पण, भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या चर्चांचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. सध्या जे मंत्री आहेत, ते मंत्री राहतीलच पण खातेवाटपासाठी आता ज्या मंत्र्यांकडे जास्तीची खाती आहेत, त्यापैकी काही खाती नव्या मंत्र्यांकडे सोपवली जातील. पण राजीनामा कोणाचाच घेतला जाणार नाही.