मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सत्तेत सामील करून घेत त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांच्यासोबत आलेल्या दिग्गज नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचा हार घालण्यात आला. मात्र या सर्व प्रकारातून भाजपला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न राजकीय क्षेत्रात चर्चेला आहे.
भाजपचा हा डाव शिंदे गटाला अद्दल घडविण्यासाठी आहे की ‘राष्ट्रात मोदी राज्यात शिंदे’ या जाहिरातीचा परिणाम आहे, असे चर्चेचे दोन प्रवाह आहेत. याशिवाय ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार केली, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पूर्णपणे घरी बसविण्यासाठी भाजपने हा डाव खेळला आहे, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र या राजकीय डावपेचाचा फायदा अजित पवार यांना सत्तेत राहण्यासाठी होणार असला तरीही आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन करण्यासाठी भाजपने हा डाव रचल्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपची लाट जोरात होती. त्यामुळे दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा परिणाम सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर झाला. पश्चिम बंगाल, ईशान्य आणि ओडिशामध्ये भाजपला काही करता आले नसले तरीही काँग्रेस आणि स्थानिक पक्षांना धक्का नक्कीच दिला होता. त्याशिवाय संपूर्ण देशात भाजपचेच राज्य होते. कर्नाटकात तर लोकसभा निवडणुकीला २८ पैकी २५ खासदार निवडून आले होते. पण आत्ता झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपची अत्यंत वाईट अवस्था झाली.
उत्तर प्रदेशात भाजपचा चांगला जम बसलेला आहे. महाराष्ट्रातही गेल्या लोकभेत ४८ पैकी ४१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण आता संपूर्ण देशात भाजपविरोधी पक्ष एकवटल्यामुळे महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भिती भाजपला आहे. त्याच पॉलिटिकल एड्जस्टमेंटमधून राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेतल्याची शक्यता आहे.
भाजपची चिंता वाढली
काही दिवसांपूर्वी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत पाटण्यात शक्तीप्रदर्शन केले. त्याचा फारसा परिणाम होणार नाही असे भाजपचे नेते म्हणत असले तरीही भाजपची चिंता वाढली आहे हे महाराष्ट्रातील तडजोडीवरून सिद्ध होते.
समान नागरी कायद्याची तयारी
मोदी सरकारला २०२४ च्या निवडणुकीपूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करायचा आहे. पण हा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारला संपूर्ण देशातून समर्थन हवे आहे. याचीच तयारी म्हणून राष्ट्रवादीला सोबत घेतले असल्याचेही बोलले जात आहे.