मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि भाजपचं फार काही छान चाललय असं नाही, हे सिद्ध करणारी घटना मंगळवारी सकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरून स्पष्ट झाले. पण हे सारे भाजपच्या नकळत घडल्याने भाजपमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली. या प्रकरणावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट मत नोंदवले आहे.
‘राष्ट्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे’ असा संदेश देणारी जाहिरात मंगळवारी शिवसेनेने प्रसिद्ध केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत. तर सोबत राज्यातील एका सर्वेक्षणात २६.१ टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे, तर २३.२ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे, असा दावाही जाहिरातीत करण्यात आला. त्यावरून भाजपमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली. आतापर्यंत इतर मंत्री आणि आमदारांमध्ये धुसफुस सुरू असताना शिंदे आणि फडणवीस यांच्यातील मतभेद प्रथमच चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. परंतु, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा अत्यंत खोडसाळपणा असल्याचे मत नोंदवले आहे.
‘ही जाहिरात खोडसाळपणा असून ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला, याचे समाधान आहे. आमची असो वा त्यांची, चूक झाली तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. परंतु, या या जाहिरातीमुळे राज्यभरातील भाजपचे आमदार, खासदार व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. युतीमध्ये असताना शिवसेनेकडून अश्याप्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. पुन्हा अशी चूक होऊ नये याची काळजी शिवसेनेला घ्यावी लागेल,’ अशी तीव्र शब्दात प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. सोबतच या यासंदर्भात फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फडणविसांशी तुलना अशक्य
या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तुलना करण्यात आली आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी राज्यात अनेक कामे केली आहेत. पक्षातील लाखो कार्यकर्ते घडविले आहेत. त्यामुळे ही तुलना केवळ अशक्य आहे, असेही बावनकुळे म्हणाले.