छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-भाजप सरकारला वर्षपूर्ती होत असताना दोन्ही पक्षातील वादविवाद चव्हाट्यावर येत आहेत. रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिंदे गटाला खोकेवाले म्हणण्यास सुरुवात केले आहे. यामुळे शिंदे गटाची चांगलीच गोची झाली असून येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नवीन समीकरण तर नाही ना तयार होणार, अशीही चर्चा आहे.
भाजपचे नेते माजी आमदार श्रीकांत जोशी अध्यक्ष असलेल्या टीचर्स एज्युकेशन सोसायटी संचलित विज्ञान वर्धिनी शाळेचे डॉ. रवींद्र कुलकर्णी हे माजी विद्यार्थी आहेत. तर त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल शाळेने त्यांचा शनिवारी सत्कार केला.
दरम्यान, याचवेळी अध्यक्षीय समारोपात माजी आमदार जोशी यांनी बोलताना काही फटकेबाजी देखील केली. “भाजपचे केंद्रात आणि राज्यातही सरकार आहे. त्याची तुम्हाला मदत होईल. त्यातच तुम्हाला चंद्रकांत पाटील हे ‘डोकेवाले’ मंत्री मिळाले आहेत. ते ‘खोकेवाले’ नाहीत. त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, अशा शब्दात भाजपचे नेते, माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच अप्रत्यक्षपणे टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पदवीधरचा आमदार म्हणून काम करताना शिक्षण क्षेत्राचा जवळून अनुभव आला. मी ज्या महाविद्यालयात शिकलो ते प्राचार्य ना. य. डोळे यांच्या नावाने प्रसिद्ध होते. आताही शिक्षकांच्या नावानेच शाळा, महाविद्यालयांची ओळख असावी. मी शिक्षण मंत्री झाल्यास पहिल्यांदा उच्च शिक्षण विभागाची सहसंचालक कार्यालये बरखास्त करून टाकेन. सर्व कारभार कुलगुरूंच्या हातात देईन, असेही जोशी म्हणाले.
नांदेडमधील बॅनरची चर्चा
भाजपच्या नेत्यांकडून देखील आता ‘खोकेवाले’ असा उल्लेख होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील नांदेडमध्ये तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके असे बॅनर लागले होते. नांदेडमधील या बॅनरची बरीच चर्चा आहे.