मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट भाजपमुळे नाराज आहे. मंत्रीमंडळ विस्ताराचा विषय असो, मंत्र्यांच्या विभागाला महत्त्व देण्याचा विषय असो किंवा आला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा विषय असो… शिंदे गट भाजपच्या भूमिकांमुळे अस्वस्थ झाला आहे. यातून शिंदे गटात निर्माण झालेली खदखद आता चव्हाट्यावर आली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात शिंदे गटासोबत कुठलीही चर्चा न करता निवडणूक प्रभारी नेमले. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने निवडणुकीच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. पण एकत्र लढताना भाजपने आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती, असे शिंदे गटाचे आमदार-खासदार बोलू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर मतदारसंघांवरील दाव्यावरून शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाले. हळूहळू हा कोल्डवॉर सर्वांच्या पुढे आला असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भाजपविरोधातील नाराजी जाहीर केली आहे. अश्यात गेल्यावर्षी झालेली ही युती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच तुटते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे भाजपने शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघांमध्येही निवडणूक प्रभारी नेमले आहेत. त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. सध्या शिंदे गटाचे १३ खासदार भाजपसोबत आहेत. या सर्व खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी नेमण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, शिवसेनेच्या खासदारांचे भाजपच्या ज्या नेत्यांसोबत चांगले संबंध नाहीत, त्यांनाच प्रभारी नेमण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
ही तर वेगळीच तयारी
भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. पण आता भाजपने रंग दाखवायला सुरुवात केली आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. ही तर भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी दिसत असल्याचेही बोलले जात आहे.
Maharashtra Politics BJP Shinde Group