मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षावरील नाराजी लपलेली नाही. २०१९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तो पराभव पक्षातील काही लोकांच्या कुरघोडीमुळे झाल्याचे बोलले जात असतानाच त्यांना पक्षानेही कुठलीही महत्त्वाची जबाबदारी सोपविलेली नाही.
मराठवाड्याचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून बाजूला पडलेल्या अवस्थेत आहेत. अशात माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीदिनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या आक्रमक भाषणाने राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. पंकजा स्वत:चा पक्ष काढण्याच्या चर्चांना वेग आला असल्याने त्यांच्या राजकीय निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
पंकजा मुंडे स्वत:च्या आक्रमक, बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा यशस्वीरित्या पुढे नेत असताना पक्षातील त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. अशात त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी केलेल्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना स्वत:चा पक्ष काढण्याची गळ घातली आहे. कार्यकर्त्यांच्या या भावनिक आवाहनाला पंकजा साद देत पक्ष स्थापनेचा निर्णय घेणार की भाजपसोबतची एकनिष्ठता कायम ठेवणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
मुख्य म्हणजे गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशात पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे.
अमित शहांची घेणार भेट
पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गोपीनाथ गडावर मुंडेंना श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. माझे नेते अमित शाह आहेत. लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांना काँग्रेसकडून ऑफर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Maharashtra Politics BJP Pankaja Munde