मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात सलग दुसऱ्यांदा भूकंप घडवून भारतीय जनता पक्षाने ऑपरेशन लोटस यशस्वी केल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये फूट पाडली. आता भाजपने अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. त्याचबरोबर भाजपने सलग दुसऱ्यांदा विरोधी पक्ष नेता फोडला आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रे स सोडून थेट भाजपमध्ये येण्यास भाग पाडले. तर, आता अजित पवार यांना राष्ट्रवादीतच बंड करायला लावले आहे. त्यामुळे भाजपने विखे-पाटलांनंतर अजित पवार यांनाही फोडले आहे.
भर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारला पाठींबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदी असलेले अजितदादा आता उपमुख्यमंत्री झाले असताना विरोधीपक्षनेतेपदाचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि शिवसेने या दोनपैकी कुणाच्या गळ्यात विरोधीपक्षनेतेपदाची माळ पडणार, या प्रश्नचिन्ह कायम आहे.
असे आहे पक्षीय बलाबल
अजित पवार यांना राष्ट्रवादीतील ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळीच अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीची आपल्याला कल्पना नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील ३५ आमदारांचा जर अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडील विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे विधानसभेत ५४ आमदार आहेत. त्यापैकी ३५ आमदार अजित दादांसोबत गेल्यास उर्वरित १९ आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत असे चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेत १६ आमदार आहेत, तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. परिणामत: काँग्रेस विरोधीपक्षनेतेपदावर दावा करणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी देखील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काकासाहेब कुलकर्णी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच विरोधी पक्ष नेते होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात लोकशाही संपावण्याचा विडा भाजपने उचलेला आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
आव्हाड यांच्या नावाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, आमदारांचे संख्याबळ पाहता आव्हाड होतील की नाही याबाबत संदिग्धता आहे.
यांच्या नावाची चर्चा
विधानसभा विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी प्रदेशप्रमुख बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत.