मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार व अजित पवार यांच्या पुणे येथील गुप्त बैठकी मागील कारण अद्याप समोर आले नसले तरी भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिल्याची आता चर्चा आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन ऑफर्स देण्यात आल्या असल्याचेही सांगितले जात आहे. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. या गुप्त बैठकीत भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण, ही ऑफर त्यांनी नाकारली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली. अशी चर्चा आज सुरु आहे.
अजित पवार हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितले असल्याचे बोलले जात आहे. काल पुण्याची ही गुप्तबैठक जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्यामुळे होती अशी चर्चा सुरु होती. अगोदर तर अतुल चोरडीया यांनी ही बैठक झाली नसल्याचे सांगितले होते. पण, काल या भेटीबद्दल शरद पवार यांनीच स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आता ही चर्चा सुरु आहे.
गुप्त बैठकीबाबत शरद पवार म्हणाले…
माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे. त्यामुळे मला कुणी भेटायला आले किंवा मी कुणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषय बनू शकत नाही. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सामान्य जनतेला हे आवडत नाही. त्यामुळे त्याचे परिणाम भविष्यात दिसतील असेही ते म्हणाले
यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकी बाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये १ सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
In that secret meeting, BJP gave these offers to Sharad Pawar through Ajit Pawar Maharashtra Politics Ajit Pawar Secret Meet Sharad Pawar Offers NCP Pune Political BJP