पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, आजच्या या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली आहे. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार आणि अजित पवार हे प्रथमच एका व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन केले नाही, त्यांना नमस्कारही केला नाही. अजित पवार यांनी शरद पवार यांना व्यासपीठावर दोन वेळा टाळल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला होता.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
यापूर्वी तीनदा भेट
बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची एकूण तीनवेळा भेट घेतली होती. पहिल्यांदा ते त्यांच्या काकू प्रतिभा पवार यांच्या प्रकृतिची विचारपूस करण्यासाठी गेले होते. प्रतिभा पवार यांच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानिमित्त ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांचे समर्थक पदाधिकारी व मंत्री यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना भेटले. तर, विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते.
आणि आता नमस्कारही नाही
शरद पवार हे अजित पवारांचे सख्खे काका आहेत. राजकारणाचे धडे त्यांनी शरद पवार यांच्याकडूनच घेतले आहेत. भाजप सोबत जाऊन अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली आहे. मात्र, शरद पवार यांचे विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांना नमस्कार करीत होते., त्यांच्याशी हस्तांदोलन करीत होते. आणि सख्खे पुतणे अजित पवार यांनी काकांना टाळल्याचे दिसून आले.
maharashtra politics ajit pawar ncp sharad pawar video pune lokmanya tilak award pm narendra modi ceremony