मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुकांची घोषणा कुठल्या क्षणी होईल सांगता येत नसले तरी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे निकाल पुढे आले आहेत. त्यानुसार भाजपच्या ६० टक्के जागा कायम राहणार असून ४० टक्के जागा धोक्यात असल्याचे म्हटले आहे. या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाने भाजपची झोप उडाली आहे.
सध्या संपूर्ण देशभरात जी-२० चे वातावरण आहे. दिल्ली येथे हा सोहळा होत आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रमुख उपस्थित झाले आहेत. अशात येत्या काळात निवडणुका होणार असून त्यादृष्टीने एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. भाजपच्या या सर्वेक्षणात विद्यमान जागांपैकी ४० टक्के जागा ते गमावणार असल्याचे म्हटले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन -अडीच महिन्यात केले. उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यावर नव्याने सर्वेक्षण करण्यात आले.
प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार-खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकाऱ्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी आणि आमदार-खासदाराविषयीचे मत आदी बाबींविषयी विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक आमदार-खासदाराच्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत घेतला. त्यात भाजपच्या प्रत्येक आमदार-खासदाराचे सर्वेक्षणानुसारचे रिपोर्ट कार्ड देण्यात आले व त्याविषयी कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली. लोक प्रतिनिधिच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आल्या असून तो मतदारसंघ भाजपला किती सुरक्षित आहे किंवा धोक्यात आहे, याविषयी बारीकसारीक तपशील देण्यात आला आहे.
५०-६०टक्के लोकांची मोदींना पसंती
सर्वेक्षणात जनतेकडून मोदी आणि आमदार-खासदाराबाबत घेतलेल्या प्रतिसादानुसार (फीड बँक) ५०-६०टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे, मात्र उमेदवार बदलण्याचे मत व्यक्त केले आहे. संबंधित लोकप्रतिनिधीने करोना काळात व नंतरही आरोग्य प्रश्नी मदत केलेली नाही, अन्य कामे केलेली नाहीत, उर्मटपणे वागणूक दिली जाते, भ्रष्टाचार आहे, आदी अनेक तक्रारी केल्या आहेत. मुंबईतील भाजपच्या खासदारांपैकी मनोज कोटक यांना उपनगरी रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची जाण असून अन्य खासदारांना ती नाही, असाही एक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
Maharashtra Politics Ajit Pawar NCP BJP Benefit Loss Survey