मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांनी स्वत:चा वेगळा गट सत्तेत आल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घोषित केले आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र देण्यात आले आहे. तर, रुपाली चाकणकर यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी आणि सूरज चव्हाण यांची युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी वेगळे होताच पक्षातील संघटनात्मक पदांची घोषणा केली आहे. त्यामध्ये सर्वांत आधी तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. काल रात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची शरद पवारांकडे शिफारस केली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी २ जुलै २०२३ रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडले आणि अपात्र ठरले आहेत. माझी विनंती आहे की शरद पवार साहेब यांना तात्काळ कारवाई करावी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यानुसार तटकरे, पटेल यांच्यावर कारवाई झाली. मात्र, तोच अजित पवार यांनी तटकरे यांना त्यांनी दावा ठोकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घोषित केले.
सुनील तटकरे हे पवार कुटुंबीयांच्या निकवर्तीयांपैकी एक आहेत. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तर पुत्र अनिकेत तटकरे देखील राजकरणात सक्रिय आहे. तटकरे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. तटकरे कुटुंबीय अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अनेकांना धक्कादेखील बसला आहे.
फडणवीसांशी चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली. तब्बल एक तास ही चर्चा सुरू होती. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य कायदेशीर पेचप्रसंग आणि तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.