अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्याच काकाला ग्रामपंचायत निवडणुकीत आस्मान दाखवणारे साजन पाचपुते हे आज सायंकाळी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. सांयकाळी ५ वाजता ते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे पक्षप्रवेश करणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे साजन पाचपुते हे पुतणे आहेत. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात काका विरुध्द पुतण्याची राजकीय लढत या मतदार संघात बघायला मिळणार आहे.
बबनराव पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडले गेलेले भाजपचे आमदार आहेत. ते १९८५, १९९०, १९९५, २००४, २००९ आणि २०१९ च्या निवडणूकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. त्यांनी अनेक वेळा मंत्रीपदही भूषविले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. पण, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वी काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत चांगलीच रंगली होती. या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी बहुमताने विजय मिळवला होता. त्यामुळे ते चर्चेत आले. बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली. त्यानंतर हा राजकीय संघर्ष सुरु झाला.
सरपंचाच्या निवडणुकीनंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकही लढवतील. या निवडणुकीतही त्यांनी आमदार पाचपुते यांच्या गटाला शह दिला. आता त्यांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत बबन पाचपुते यांना शह देण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ते कोणत्याही राजकीय पक्षात नव्हते. पण, आता ते ठाकरे गटात प्रवेश घेणार आहे. गेल्या महिन्यात मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली, त्यावेळी साजन हे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते.
Babanrao’s nephew Sajan Pachpute in the Thackeray group
Maharashtra Politics Ahmednagar Nephew Uncle Thackeray Group Joining