मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना सत्तासंघर्षाशी संबंधित विविध मुद्यांवर निर्णय घ्यायचा आहे. त्या अनुषांगने विधिमंडळ सज्ज झाले असून लवकरच या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले. विरोधी पक्षातील नेत्यांनी ९० दिवसांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता विधीमंडळात सत्तासंघर्ष रंगणार आहे. आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीनीला वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
दोन्ही नेत्यांची उलट तपासणीही होण्याची शक्यता
विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याची माहिती आहे. विधीमंडळाकडून आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी केली आहे. गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. आमची शिवसेना म्हणणाऱ्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलट तपासणीही होण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष सुरुवातीला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Political Crisis Thackeray Shinde