नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाच्यावतीने त्यांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने आजच्या सुनावणीत स्पष्ट केले की, पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला घेतली जाईल. त्या सुनावणीत निश्चित केले जाईल की हे प्रकरण ७ सदस्यीय घटनापीठापुढे पाठवायचे की नाही.
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोेहली आणि न्यायमूर्ती पी.एस.नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज या प्रकरणाची सुनावणी झाली. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला की, विधानसभा अध्यक्ष-उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली असेल, तर त्यावर विधानसभेत निर्णय होईपर्यंत पीठासीन अधिकाऱ्याला आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेता येणार नाही. तसा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अरुणाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष नाबिम रेबिया प्रकरणी दिला आहे. त्यामुळे या मुद्याचा सात सदस्यीय घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली. त्यामुळे आता ५ सदस्यीय घटनापीठच या प्रकरणाची सुनावणी करेल की ७ सदस्यीय हे १४ फेब्रुवारीलाच निश्चित होणार आहे. त्यामुळे आता महिनाभर लांबणीवर हे प्रकरण गेले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात पुढची तारीख आता 14 फेब्रुवारी
सलग सुनावणी घेण्याचे घटनापीठाचे संकेत
7 न्यायमूर्तींकडे प्रकरण जाणार का याचा फैसलाही तेव्हाच
शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे तर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल अशी लढाई रंगणार
व्हॅलेंटाईन डे पासून कायद्याची लढाई
— Prashant Kadam (@_prashantkadam) January 10, 2023
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Today
Shivsena Politics Eknath Shinde Uddhav Thackeray