नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय घेतला आहे. ही सुनावणी ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली होती. यासंदर्भात आज सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडेच राहणार आहे. तसेच, याप्रकरणी येत्या २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी करण्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाने त्यांचा युक्तीवाद पूर्ण केला आहे. दोन्ही गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. याच सुनावणीत न्यायालय स्पष्ट केले की, नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार करण्याची गरज नाही. तसेच, हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
साडेसात महिने आणि २० तारखा
हे प्रकरण सात न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात दोन्ही गटांकडून युक्तीवाद सुरू होता. शिंदे गटाने जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांची बाजू आक्रमकपणे मांडली. अखेर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र, न्यायालयाने आता निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाऊन साडेसात महिने झाले आहेत. तसेच, न्यायालयात आजापर्यंत एकूण २० तारखा झाल्या आहेत. आता २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणी आता अंतिम निकाल लवकरच लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1626452022265548801?s=20
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing