नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सत्तासंघर्षाचा वाद सुरु असून, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणावर आज सुनावणी झाली असून निकाल पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. आता २९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष नेमका कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटांकडून पक्षावर हक्क सांगितला जात आहे. याबाबत आज (दि. ०१) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ठाकरे – शिंदे या दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. पक्षावर हक्क सांगण्याबरोबरच, दोन्ही गटांनी पक्षचिन्हावरही दावा केला होता. यात निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. या वादाला २० जूनपासून सुरुवात झाली. तेव्हापासून नेमका पक्ष कोणाचा याविषयी खल सुरु आहे.
ठाकरे गटाने शिंदे सुरतेला गेलेले असतानाच १६ आमदारांना अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावर आधीच अपात्रतेचा प्रस्ताव पेंडिंग असताना ते कारवाई करू शकत नाहीत, अशी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक आयोगाला देखील शिवसेना कोणाची, पक्ष चिन्हावर निर्णय देण्यास स्थगिती द्यावी, अशा वेगवेगळ्या विषयांच्या पाच सहा याचिका दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेगळे घटनापीठ स्थापन केले. आता पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतेला निघून गेले होते. त्यानंतर आणखी काही आमदार शिंदेंना जाऊन मिळाले. यातील दोन आमदार पुन्हा मागे फिरले. त्यानंतर सर्व बंडखोर गुवाहाटीला गेले आणि इतर काही आमदार, मंत्री जाऊन मिळाले. असे शिवसेनेचे आणि मित्र पक्ष, अपक्ष मिळून शिंदेंनी ५० आमदार आपल्या बाजुने केले. यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सत्तांतराचा खेळ सुरु झाला. भाजपाने शिदेंना सोबत देऊन त्यांना मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीपासूनच शिंदेंनी शिवसेनेवरचा दावा केला. स्वत:चे पदाधिकारी नेमले. यावरून खरी शिवसेना कोणाची, धनुष्य बाण चिन्ह कोणाचे आदी वाद सुरु झाले.
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing