नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी शिंदे गटाकडून न्यायालयाला काल विनंती करण्यात आली होती. ती मान्य करीत आज न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. राज्यातील राजकीय आणि सत्ता संघर्षावर न्यायालयाने घटनापीठ स्थापन केले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील या घटनापीठात पाच न्यायमूर्तींचा समावेश आहे. आता या घटनापीठासमोर येत्या २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. घटनापीठासमोर होणारी ही पहिलीच सुनावणी असणार आहे. त्यामुळे घटनापीठ त्यावर काय निर्णय देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिंवसेनेत मोठी बंडखोरी केली. ४० आमदारांसह त्यांनी वेगळा गट स्थापन केला. भाजपच्या मदतीने या गटाने सत्ता स्थापन केली आहे. तसेच, शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने शिंदे यांच्यासह १२ आमदारांना अपात्रतेची कारवाई करण्याची विनंती तत्कालिन विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. तसेच, शिंदे यांनी सेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला आहे. या सर्व प्रकरणांचा निकाल घटनापीठात लागणार आहे.
पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. आम्ही २७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले आहे. त्याच दिवशी निवडणूक आयोगा संदर्भात सर्वांचे थोडक्यात युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत तीन ते चार सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, ठोस निर्णय अद्यापही आलेला नाही. त्यानंतर याप्रकरणी तारीख पे तारीख सुरू आहे. आता याप्रकरणासाठी घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. अद्याप या घटनापीठासमोर सुनावणी झालेली नाही. येत्या २७ सप्टेंबरला घटनापीठासमोर पहिली सुनावणी होणार आहे. मात्र, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरच्या सुनावणीतही अंतिम निकाल लागू शकणार नाही. त्यासाठी आणखी काही सुनावण्या होण्याची चिन्हे आहेत.
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing
Shivsena Uddhav Thackeray Politics Rebel Eknath Shinde