नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही हा संघर्ष कायम आहे. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी उद्या (सोमवार, २२ ऑगस्ट) होणार आहे. या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
गेल्या दोन सुनावणीत दोन्ही बाजूने ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तीवाद केला आहे. याप्रकरणी ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून १२ ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही तारीख बदलून २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे सुनावणीत. हा बदल का झाला हे स्पष्ट झाले नाही. मात्र, आता उद्या होणाऱ्या या सुनावणीबाबत उद्धव यांनी प्रतिक्रीया दिली आहे. उद्द हे आज सेना कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, माझा न्यायव्यवस्थेवर दृढविश्वास आहे. उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल. आणि जनता गद्दारांना नक्की धडा शिकवेल, असेही उद्धव म्हणाले.
या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचे लक्ष लागले आहे. अभूतपूर्व राजकीय संकट आणि घडामोडी राज्यात घडल्या. आणि आता शिवसेनेतील मोठी फूट थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. त्यातच सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता २२ ऑगस्टला काय होते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing