मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत आणि पुढेही घडत राहतील, असे दिसते. राज्यातील बंडखोरीचा इतिहास नेमका कसा आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी पवार यांनीही बंडखोरी केली होती.
शरद पवार यांनी बंडखोरीचे जुने प्रसंग सांगितले. ते म्हणाले की, शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. अनेक पक्षात बंड होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना छगन भुजबळ यांनी बंड केले होते, त्यानंतर नारायण राणे यांनी बंड पुकारले. याशिवाय नंतरच्या काळातही अनेकांनी बंडखोरी केली. परंतु जनतेने त्या त्या वेळी संबंधितांचा पराभव केला, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. कारण बंडखोरांपेक्षा शिवसैनिकांची भूमिका नेहमीच वेगळी राहिली आहे. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे पवारांनी स्पष्ट केले.
इतकेच नव्हे तर स्वतःचे उदाहरण देत शरद पवार यांनी सांगितले की, सन 1981 मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसांनी परत आलो. त्यावेळी माझ्यासह केवळ सहा लोक राहिले. आधी मी 67 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. आता मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझे पदही गेले. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम 73 झाली, याची आठवणही पवारांनी करुन दिली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडा संदर्भात पवार म्हणाले की, काही वेळ अदृश्य शक्ती प्रामाणिकपणे काम करत असेल. विमानं तयार असतात, हॉटेल असतात. काही प्रभावी लोक असतात, आता आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट म्हणून 38 आमदार बाहेर जातात. ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचे यश आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
Maharashtra Political Crisis Rebel MLA History